मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची शुक्रवारी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत दारूची बाटली आडवी झाली आहे. दारूबंदीच्या बाजूने १ हजार १११ महिलांनी मतदारांनी हक्क बजावल्यामुळे चंदनपुरी शिवारातील दारू दुकाने बंद होणार आहेत. या निकालामुळे महिलावर्गांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण दिसून आले. महिलांनी जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला.तालुक्यातील चंदनपुरी येथे शुक्रवारी दारूबंदीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान घेण्यात आले. यात २ हजार ९१ महिला मतदारांपैकी १ हजार १११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ वाजेनंतर तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांच्या उपस्थितीत मतदान चिठ्ठ्यांचा गठ्ठा करण्यात आला. यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. दारूबंदीच्या बाजूने १ हजार १११ मतदान झाले, तर ६९ महिलांनी विरोधात मतदान केले. ५७ मतदान बाद झाले. तहसीलदार अवळकंठे यांनी दारूबंदीच्या बाजूने निकाल जाहीर केला.यावेळी महिलांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. दारूबंदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
चंदनपुरीला बाटली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:53 AM