लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती. नदीकाठच्या गंगानगर, बाजारतळ या भागात पाणी घुसले असून, येथील रहिवाशांना रविवारी मध्यरात्री सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्याचा वाढता वेग पाहून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गोदावरी नदीत विसर्ग सुरू झाला की पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावाकडे असते. चार दिवसांपासून निफाड तहसीलदार, सर्कल, पोलीस प्रशासन या ठिकाणी ठाण मांडून आहेत. नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे तर सायखेडा येथील धोकादायक पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक नागरिक पुलावर थांबून सेल्फीचा आनंद घेतात; मात्र परिस्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या पाण्याबरोबर पानवेली वाहून येत असून, त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्याने पुलाखालून पाणी वाहण्यास अडथळा होत होता. त्यामुळे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र पानवेलीच्या विषयावर प्रशासनाने कानावर हात ठेवले होते. पाण्याचा वेग पाहून प्रशासनाने रात्री १२ वाजता पानवेली काढण्याचे काम सुरू करत पानवेली बाहेर काढण्यात आल्या आहेत.खंडेराज महाराज मंदिर पाण्याखाली४पुराच्या पाण्यामुळे चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे पाणीपुरवठ्याची विहीर पाण्यात गेल्याने पिण्यासासाठी गोदाकाठ भागातील सर्व गावांना कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. ४गोदाकाठ भागात सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरात थांबनेच पसंत केले आहे. सततच्या पावसामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक गणिते कोलांडण्याची शक्यता आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीरसततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, पाऊस पडत असल्याने शेतात असलेला चारा कापता येत नाही. त्यामुळे चार दिवसांपासून चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अवघड झाला आहे, एकंदरीत अशी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चांदोरी, सायखेड्याला पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:39 AM