दत्ता दिघोळे : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील गोदा नदीपात्र कोरडेठाक पडल्याने सुमारे तीन दशकानंतर पौराणिक हेमाडपंती मंदिरे पाहण्याचा व इंद्रदर्शन करण्याचा योग तूर्तास बंद झाला आहे. गोदावरी नदीपात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडल्याने भाविकांना सध्यातरी याठिकाणी दर्शन घेता येणार नाही. चांदोरी येथे गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक झाल्याने उघडे पडलेल्या पेशवेकालीन, पौराणिक हेमाडपंती मंदिरांचे दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन गोदावरी नदीपात्रातून बंधारे भरण्यासाठी आर्वतन सोडण्यात आले आहे. बुधवारी रात्री सदर पाणी चांदोरीपर्यंत पोहचले. गुरुवारी थोड्याशा पाण्यातून जाऊन भाविकांनी मंदिरे पाहण्याचा व दर्शनाचा लाभ घेतला. मात्र गुरुवारी रात्रीपासून सदर मंदिरे पाण्यात गेल्याने याठिकाणी जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणी आटल्याने कायम पाण्याखाली राहणारी अनेक मंदिरे गेल्या आठवड्यात उघडी पडल्याने पर्यटक व भाविकांसाठी पर्वणी ठरली होती. मात्र गोदावरी नदीपात्रात पुन्हा पाणी आल्याने तूर्तास याठिकाणी जाता येत नाही.
चांदोरी : तीन दशकानंतर प्रथमच नदीपात्र झाले होते कोरडे
By admin | Published: April 01, 2016 11:11 PM