चांदोरी : मागील आठ दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच गोदाकाठ परिसरात पावसाचा जोर असल्याने दारणा व गंगापूर तसेच इतर छोट्या धरणसमूहातून दारणा व गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने चांदोरी, सायखेडा, नागापूर, करंजगाव या गावांना पूरपाण्याचा तडाखा बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने चांदोरी-सायखेडा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे गोदाकाठच्या गावांचा संपर्कतुटला आहे.चांदोरी गावाला पूरपाण्याचा वेढा बसला आहे. गोदावरीकिनारी असलेले खंडेराव मंदिर अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली गेले आहे. स्मशानभूमी तसेच भैरवनाथ मंदिरालगत पूरपाणी शिरले आहे. गावातील नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. चांदोरी बसस्थानकामागे व शेजारी असलेल्या रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात असल्याने नदीकिनाऱ्यापासून सुमारे ५०० ते ७०० मीटर पात्राबाहेरील शेतामध्ये शिरले आहे. हे पाणी मागील दोन दिवसांपासून साचून असल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रांताधिकारी अर्चना पाठारे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व सायखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी गोदाकाठ पूरग्रस्त गावांना भेटी देऊन उपाययोजनांचे आदेश दिले आहेत.
चांदोरी-सायखेडा पूल वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:33 AM