नाशिक : ‘भीमशक्ती महाराष्ट्र राज्य ’संघटना काँग्रेससोबत तब्बल ४० वर्षापासून विविध निवणुका आणि आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी होत कार्यरत आहे. मात्र गेल्या दहा वर्षात पक्षाकाडून ‘भिमशक्ती’च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अथवा सत्तेत वाटा देताना डावलले जात असल्याचा आरोप करीत आता संघटना स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी करण्याची करीत असल्याचे सांगतानाच माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हाडोरे यांनी काँग्रेस सोडण्याचे सुतोवाच केले आहे. येथील शासकीय विश्रामगृगात रविवारी (दि.१) भीमशक्ती राज्य कार्यकारणीच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस सोडताना स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा अथवा राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्यायही आपल्या समोर असल्याचे सांगतानाच दलीत चेहरा नसलेल्या पक्षांकडून आपल्याला ऑफर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. मात्र ‘भीमशक्ती’ वंचित, अत्याचाराने त्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा विचारही करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने आफल्याला मंत्रीपद दिले, पण त्यानंतरच्या काळात आपण आणलेल्या योजना ठप्प झाल्या असून भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना महामंडळे, विविध समित्या तसेच विभानपरिषदेसह वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना डावलेल जात असल्याची भावना कार्यकार्त्यांनी राज्य कार्यकारणीच्या बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे आपण या निर्णयापर्यंत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, काँग्रेस सोडल्यानतंर कोणत्या पक्षासोबत जाणार यावषियी स्पष्टपणे कोणतेही विधान करण्याचे त्यांनी टाळले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा माजी माहापौर अशोक दिवे, राहूल दिवे, बाळासाहेब शिरसाठ, प्रशांत दिवे, आदि उपस्थित होते.