महामिने नेहमी म्हणत, आपण खेड्यात जन्मलो हे बरं झालं. अस्सल मातीची अस्सल ग्रामीण भाषाबोली रोमारोमात भिनली. प्राथमिक शिक्षण कोल्हारला, नंतर नगर, नाशिक असा त्यांचा प्रवास झाला. शिक्षणानंतर मुंबई व नाशिकला नोकरी केली. टेलिफोन खात्यात त्यांनी प्रदीर्घ सेवा दिली. पुढे नाशिकसारख्या साहित्यिक वातावरण असलेल्या शहरात त्यांची लेखणी चांगलीच खुलली. दरवर्षी जवळपास दोन डझन दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा अगदी गेल्या वर्षीपर्यंत प्रसिद्ध होत होत्या. त्यांची कथा वाचताना वाचकाला कंटाळा येत नाही. आटोपशीर व खुसखुशीत संवाद, मजेशीर कथानकातील चटपटीत वळणे यामुळे त्यांना वाचकही उदंड लाभला. वाचकाला विरंगुळा देणे हेच आपले पहिले उद्दिष्ट असे ते मानत. त्यांच्या पहिल्याच "प्रवराकाठची माणसं" या कथासंग्रहाला १९८२ ला राज्य पुरस्कार मिळाला. इसापनीती विनोद, शंकराला फुटली शिंगे, बोलक्या हत्तीची करामत (दोन बाल कादंबऱ्या), दुसरा मधुचंद्र हा विनोदी कथासंग्रह अशा अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांची ग्रंथसंपदा शंभरीजवळ आली होती. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा विमादि पटवर्धन पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, ताराबाई मोडक पुरस्कार, गिरिजा कीर कथा पुरस्कार, स्मिता पाटील साहित्य पुरस्कार आणि सावनाचा जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले .त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघतच आहेत.
चंद्रकांत महामिने समाजाभिमुख होते. तात्यासाहेबांचे घर जसे नव्या लेखक-कवींना स्वागत करणारे होते, तसेच चंद्रकांतजींचे दरवाजेही सर्वांसाठी खुले असत. अनेक नवोदितांना त्यांनी लिहिते केले. नव्या लेखक-कवींना ऐकणे, वाचणे ही त्यांची भूक होती. नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष, तसेच सटाणा, इगतपुरी, येवला, दिंडोरी येथील विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नाशिकच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात ते आबा आणि दादा या नावाने संबोधले जात. लेखनात ते खरोखरच दादा होते. अतिशय हसतमुख, नम्र, प्रेमळ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. मैफलीत खट्याळ कोट्या करून हसवणारे महामिने सतत आनंदच वाटत गेले .त्यांच्या सहवासात येणारा प्रसन्न होऊन जायचा. पाच महिन्यांपूर्वी त्यांना आयुष्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुशीला यांचेही निधन झाल्याने ते खचलेच होते. ‘लोकमत’मध्येही त्यांनी प्रदीर्घ काळ सदर लेखन केले. त्यांच्या जाण्याने माझा पन्नास वर्षांच्या सहवास असलेला एक जिवलग हरवला, दूर गेला. पोरके झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- नरेश महाजन, ज्येष्ठ लेखक