लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येथील शासकीय विश्रामगृहात उतरल्याने पुन्हा युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रांतीयांच्या मुद्द्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत भेट घेतल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले असले तरी ही संसद अधिवेशनापूर्वी चर्चेसाठी प्रघाताप्रमाणे भेट असावी, आणखी काही खास चर्चा झाली असेल तर माहिती नाही परंतु या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता कमीच आहे, असे पाटील म्हणाले.
नाशिकच्या दौऱ्यावर पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. केंद्रातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत. त्यात पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यावर बोलताना दोन घटनांचा एकत्र अर्थ लावण्याचे त्यांनी खंडन केले.
चूक केली नसेल तर घाबरायचे कारण नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते, असे गप्पांच्या ओघात सांगणाऱ्या पाटील यांनी नंतर सारवासारव केली. रात्रीतून अटक म्हटलो; परंतु कोणाचे नाव घेतले नव्हते. खूप जणांची चौकशी सुरू असून, त्यांच्या अटकेची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
केवळ मुंडे यांच्याच नव्हे, तर अन्य कारखान्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. मुळात पंकजा मुंडे नाराज नसून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते, पंकजाताईंनी त्यासंदर्भात त्यांचीही समजूत काढली आहे. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप