चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवसभरात जीप २१९, ट्रॅक्ट्रर १६३ असे एकूण ३८२ नग कांदा आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव ७०० रुपये तर सरासरी भाव १,४५० रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव १,७६८ रुपये दर होता. गेल्या १२ दिवसापासून कांदा लिलाव कोरोना पार्श्वभूमीवर बंद होते. त्यातच परवापासून कांदा लिलावास शासनाने सुरुवात करण्यास सांगितले मात्र शेतकऱ्यांना बाजार समितीत प्रवेश करताना कोरोना चाचणी अनिर्वाय केल्यामुळे शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली होती. त्यात चाचणी सक्तीमुळे अनेक शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत नसल्याची बाब लक्षात आल्याचे बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरखनाथ गांगुर्डे यांच्या लक्षात आली. त्यांनी स्थानिक आरोग्य विभागाशी संपर्क साधून शेतकऱ्यांची मोफत चाचणी करू न द्यावी तर बाजार समितीने कोरोना किट उपलब्ध करून दिल्याने त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आरोग्य मोफत चाचणी करण्यासाठी सरकारी यंत्रणा दिसून आली. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशीदेखील आवक बरी राहिली.
------------------------------------------------------
पुरी येथील इसमाचा विषारी द्रव्याने मृत्यू
चांदवड : तालुक्यातील पुरी येथील विजय सुकदेव केकाण (४०) यांचा विषारी द्रव्य सेवनाने मृत्यू झाला. त्यांना तातडीने औषधोपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक विजय घुमरे तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------
राहुड घाटात कारचालकाचा हृदयविकाराने मृत्यू
चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारचालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. नाशिकरोड येथील रवींद्र सुरेश भामरे (४१) हे त्यांच्या कारने मुंबई आग्रा रोडवरून नाशिककडे जात असल्याने अचानक त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत कर्मचारी ढुमणे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.