चांदवड : माहेरून २५ हजार रुपये आणावेत या मागणीसाठी छळ केल्याने विवाहितेने जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याने पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राधिका राकेश शिरसाठ (२६) हिचे वडील भास्कर गेणुजी वालझाडे, रा.इगतपुरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, राधिकाचा विवाह ११ जून २०१४ रोजी झाला. मुलगी सासरी आली तेव्हापासून पती राकेश, सासरे अशोक शांताराम शिरसाठ, सासू निर्मला शिरसाठ, दीर रोहित शिरसाठ, नणंद रोशनी रा. मुंबई, हे हुंडा घेऊन ये, असे म्हणून त्रास देत असत. याबाबत राधिका ही नेहमी फोनद्वारे तक्रार करीत असे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी जावई राकेश यांनी माझा मुलगा नीलेश यास फोनद्वारे सांगितले की चांदवडला निघून या राधिकाने फाशी घेतली आहे. आम्ही चांदवडला पोहोचलो तेव्हा राधिका ही मरण पावली होती. दरम्यान, चांदवड पोलीस स्टेशन व चांदवड उपजिल्हा रुग्णालयात राधिकाच्या नातलगांनी गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यासंदर्भात चारही संशयिताना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.घटनेचे वृत्त समजताच मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी भेट देऊन नातलगाची बैठक घेऊन वातावरण शांत केले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला हुंडाबळी प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे अधिक तपास करीत आहेत. ( वार्ताहर).
चांदवडला विवाहितेची आत्महत्त्या
By admin | Published: November 05, 2014 11:08 PM