चांदवड : कुलस्वामिनी रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी घटस्थापना नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, रिंकू कासलीवाल, उपनगराध्यक्ष कविता उगले, संदीप उगले यांच्या हस्ते झाली. महाआरती चांदवडचे न्यायमूर्ती के. जी. चौधरी, न्यायमूर्ती एस. एम. धपाटे यांच्या हस्ते झाली. यावेळी दिवसभरात भाविकांची पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होती, तर आमदार डॉ. राहुल अहेर यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. रविवारी (दि.२) शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सकाळी, तर रात्री माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या हस्ते महाआरती होईल. मंदिरात होम हवन, दररोज पहाटे ५ वाजता महाभिषेक, पालखी मिरवणूक, रात्री महाआरती, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या वर्षी भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी शिर्डीच्या धर्तीवर स्टीलचे बॅरिकेडिंग (दर्शन रांग) पेव्हर ब्लॉकमध्ये बसविले आहे. तर देवीच्या गाभाऱ्यात जाणारा पूर्वीचा दरवाजा लहान असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असे तो संस्थानच्या वतीने मोठा करण्यात आला. तर आता देवीचे दर्शनही बाहेरून होऊ शकते. ज्या भाविकांना गर्दीत दर्शन घ्यावयाचे नाही, ते मुख दर्शनही घेऊ शकतात. तर भविकांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र जिना तयार करण्यात आला आहे. तर यात्रोत्सव काळात विविध प्रकारची दुकानेही शिस्तबद्ध पद्धतीने थाटण्यात आल्याने परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून यावर्षी ठिकठिकाणी क्लोज सर्किट सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. नवरात्रोत्सवासाठी सोमा टोलवे कंपनी, वीज वितरण कंपनी, आबड लोढा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पोलीस स्टेशन, मेडिकल कॉलेज या संस्थांच्या वतीने स्वयंसेवक घटी बसणाऱ्यांना व भाविकांना मदत करीत आहे. यात्रा उत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल पुरुष, महिला कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी त्रास होणार नाही अशी काळजी घेतली असली तरी अजूनही काही सूचना असल्यास त्या संस्थानकडे कळवाव्यात, असे आवाहन व्यवस्थापक एम. के. पवार, सुभाष पवार यांनी केले आहे.नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, तानाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, विजय जोशी, अमोल कुलकर्णी, नारायण कुमावत, खंडू अहेर, हरिभाऊ कासव, काळू पवार व सामाजिक कार्यकर्ते किसन बल्लाळ, जगन्नाथ राऊत, संतोष देवरे, शेरू ब्रदर्स, दीपक कुमावत व चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
चांदवडला नवरात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Published: October 01, 2016 10:57 PM