चांदवड - चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा या शेतीमालाचे वाढते बाजार भावावर अंकुश ठेवणेसाठी केंद्र शासनाने घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी याचे स्टॉक लिमिटवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे चांदवड येथील कांदा व्यापारी असोशिएशनने कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
कारण कांदा हा जीवनाश्यक यादीत असून केंद्र शासनाने प्रत्येक व्यापाऱ्याला किमान २५ मेट्रीक टन पेक्षा जादा कांदा स्टॉक मध्ये असेल तर त्यावर कार्यवाही करण्याचा इशारा दिल्याने व्यापारी वर्गाने सदरचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सहाय्यक निबंधक पी.एस. पाटोळे यांच्या उपस्थितीत कांदा व्यापाऱ्यांची सकाळी ११ वाजता बैठक झाली यात व्यापारी वर्गाने आपली बाजी मांडली
सध्या बाजार समितीत लाल कांदा हा ओला येतो तो वाळवण्यास वेळ जातो याकरिता सदरचा निर्णय घेतल्याचे सांगीतले यावेळी बाजार समितीचे सचिव जे.डी.आहेर, उपसचिव जी.एन. गांगुर्डे, सर्व व्यापारी उपस्थित होते. तसेच बाजार समिती मधील कांदा व्यापारी यांचेकडे अद्याप कांदा स्टॉक मध्ये उपलब्ध असल्याने व्यापारी वर्ग हे कांदा लिलावात सहभागी होणार नाही. त्यामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्यात यावा याबाबत व्यापारी वर्गाने विनंती केली असल्याने कमंगळवार दि. २७ आॅक्टोबर पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चांदवड बाजार समिती मधील कांदा लिलावाचे कामकाज बंद राहील.तसेच मका व धान्य लिलाव नेहमीप्रमाणे सुरु असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.