चांदवडला पावसाची जोरदार हजेरी
चांदवड - शहर व परिसरात शनिवारी (दि.५) दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच धावपळ उडाली. योगायोगाने चांदवड शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन असल्याने बाजारात मात्र गर्दी नव्हती, तर पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडाली. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा शेतीमाल झाकण्यासाठी ताडपत्रीसारखी व्यवस्था न केल्याने त्यांचा कांदा भिजला होता. दुपारी मेघगर्जनेसह चांगलाच पाऊस झाला. त्यात वीज पुरवठा मात्र सातत्याने खंडित होत होता.
------------------------------------------------
चांदवडला घंटागाडी अनियमित
चांदवड : येथे दर दोन दिवसांनी येणारी कचरा संकलन करणारी घंटागाडी गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच प्रभागांत अनियमित असून, याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर घंटागाडी ठेकेदारांचे कंत्राट संपले असल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यांत घंटा गाडी नादुरस्त असल्याने वेळेवर पोहोचत नव्हती, तर चार-चार दिवस कचरा साचून दुर्गंधी येत असल्याने महिला वर्ग हैराण झाला आहे. नगर परिषदेने घंटागाडी कोरोनाकाळात नियमित पाठवावी, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------
चांदवडला मोकाट श्वानांचा सुळसुळाट
चांदवड : येथे मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून श्रीराम रोड, नगर परिषद व इतरत्र मोकाट श्वानांचा त्रास नागरिकांना होत आहे. हे मोकाट श्वान नागरिकांना रात्री झोपूही देत नसल्याची तक्रार असून, ते दिवसाही श्रीराम रोडवर प्रत्येक दुचाकीमागे धावत असल्याने नगर परिषदेने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.