लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तक्रारदाराच्या नातेवाईकास तपासात मदत करून जामीन मिळवून देण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चांदवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट निंबा खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. चांदवड पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध दारुबंदी कायद्याअंतर्गत मंगळवार (दि.१८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चांदवड पोलीसांनी तक्रारदाराच्या नातेवाईकास अटक केली होती. या प्रकरणाचा तपास चांदवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट खैरनार करीत होते. तक्रारदाराच्या नातेवाईकास तपासात सहकार्य करण्याबरोबरच जामीन मिळवुन देण्यासाठी खैरनार यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन चांदवड पोलीस स्टेशनच्या सीसीटीएनएस रुममध्ये तडजोडीअंती तक्रारदाराकडून नऊ हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांना रंगेहाथ पकडले.
चांदवडच्या पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:35 AM