नाशिक : अनुकंपा तत्वावर महिलेस नोकरीवर घेण्यासाठी पंधरा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल यांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून यावर बुधवारी (दि़९) सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़ महिलेच्या तक्रारीनुसार चिंतामण शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजदेरवाडी येथील आश्रमशाळेत त्याचे पती मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते़ त्यांचे कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्याने अनुकं पा तत्त्वावर या संस्थेत शिक्षिकेची नोकरी मिळावी यासाठी संस्थेकडे अर्ज केला होता़ समाजकल्याण विभागाने नोकरीत सामावून घेण्याचेआदेश दिल्याने तक्रारदार महिला संस्थेचे सचिव वर्धमान पांडे व संस्थेच्या अध्यक्षांचा मुलगा भूषण कासलीवाल यांना भेटण्यासाठी गेली असता त्यांनी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली़ या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळाही लावण्यात आला मात्र निवडणुकीचे काम सुरू असल्याने पैसे नंतर घेऊन जाईल असे सांगून सचिव पांडे निघून गेले़ दरम्यान आश्रमशाळेत शिक्षिकेच्या नोकरीसाठी तक्रारदार महिलेकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास मिळाल्याने त्यांनी ५ मार्चला चांदवड पोलीस ठाण्यात या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)
चांदवडचे नगराध्यक्ष अटकपूर्वसाठी न्यायालयात
By admin | Published: March 08, 2016 11:52 PM