महेश गुजराथी चांदवडपुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा पुरातन ठेवा असलेल्या रंगमहालाचे काम गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. शासनाने सदर कामाकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.अहल्यादेवींचा रंगमहाल चांदवडच्या इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील विविध प्रकारच्या कार्यालयांमुळे याची देखभाल होत होती, मात्र ही कार्यालये येथून गेल्याने हा देखणा वाडा काळाच्या पडद्याआड जाईल की काय अशी अवस्था आहे. मात्र पुरातत्त्व विभागाने रंगमहालची दुरुस्ती आणि मूळ ढाचा कायम ठेवून नूतनीकरणासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी आला असून, याचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू असून, ते संथ गतीने सुरू आहे. दुरुस्तीच्या नावावर काम सुरू असले तरी वर्षानुवर्ष या रंगमहालची छप्परे काढून घेतल्याने पावसाळ्यात जुनी कोरीव लाकडे व ऐतिहासिक ठेवा सडण्याच्या मार्गावर आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचा राजवाडा असणारा रंगमहाल व होळकर वाडा हा इंदूर ट्रस्ट खासगी देवी अहल्याबाई होळकर चॅरिटी ट्रस्ट (मध्य प्रदेश सरकार) या शासकीय प्रतिनिधींच्या अधिपत्याखाली आहे. त्याचे व्यवस्थापन चांदवड येथे असून, व्यवस्थापक एम.के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार हे काम बघत आहेत. वर्षानुवर्ष या रंगमहालात वेगवेगळ्या प्रकारची २१ शासकीय कार्यालये सन १९९०पर्यंत कार्यरत होती. पुरातत्त्व विभागाच्या ठेकेदारांनी निकृष्ट प्रकारचे काम करून रंगमहालावरील कौले काढून घेतल्याने उघड्याबोडक्या अवस्थेत असलेल्या रंगमहालच्या इमारतीमध्ये पाणी घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. योगायोगाने प्रारंभीच्या काळात पाऊस न झाल्याने रंगमहालवर पडझडीची वेळ आली नाही. मात्र ऊन, वारा, पाऊस यामुळे या उघड्या साठ्यात पाणी मुरून रंगमहालाची जीर्ण अवस्था झाली आहे.
चांदवडच्या रंगमहालचे काम कासव गतीने
By admin | Published: May 30, 2016 10:39 PM