जायखेडा : जायखेडा येथील प्रगतशील शेतकरी तथा पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ केदू ब्राम्हणकार यांच्या कांदा चाळीस सोमवारी (दि.२०) रात्री दोन वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागल्याने जवळपास १५०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. यात शेतीउपयोगी साहित्यासह कांदा चाळ व साठवून ठेवलेला कांदा असे सुमारे १३ लाख ८२ हजार रु पयांचे नुकसान झाले.जायखेडा गावाजवळील आदिवासी वस्तीलगत असलेल्या स्वमालकीच्या खळवाडीत ८० फुट लांब पाचटचे छत असलेल्या कांदा चाळीत शेतकऱ्याने दोनही बाजूंच्या कप्प्यात ५० ते ६० ट्रॉली कांदा साठवून ठेवला होता. आज सोमवारी उत्तररात्री दोन वाजेच्या सुमारास कांदा चाळीला अकस्मात आग लागल्याने मोठ्या प्रमाणात कांदा जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागल्याची कुठलीही ठोस शक्यता नसतांना ही आग लागली कशी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील रहिवाशी कन्हैया काठेवाडी, रज्जू मन्सुरी, योगेश ब्राम्हणकार, दिलीप लोंढे, अशोक अहिरे, उद्धव ब्राम्हणकार, मच्छिंद्र अहिरे, युनुस मन्सुरी, विजय अहिरे, जब्बार पठाण, अमोल अहिरे, शकील मन्सुरी, रामदास खैरनार, अमोल लोंढे, योगेश खैरनार, शिवाजी खैरनार, भावडू नाहिरे, दादाजी ठाकरे, किरण ब्राम्हणकार, डॉ. संदीप ब्राम्हणकार, आदींसह आदिवासी वस्तीवरील तरु णांनी घटनास्थळी धाव घेवून झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दुर्दैवाने या आगीत साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, दिवसभर गावातील अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन हळहळ व्यक्त करीत ब्राम्हणकार कुटुंबियांना दिलासा दिला. जायखेडा मंडळ अधिकारी एस. के. खरे, तलाठी संतोष घोडेराव यांनी पाहणी करून पंचनामा केला. झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी सोमनाथ ब्राम्हणकार, सुदाम ब्राम्हणकार, देवदत्त ब्राम्हणकार, संजय ब्राम्हणकार यांनी केली आहे.
चाळीला आग लागून लाखोंचा कांदा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 5:37 PM
जायखेडा : सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान
ठळक मुद्देझाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात