नाशिक : बँक खात्याच्या व्यवहार अधिकारात बदल करण्यासाठी एका कंपनीतील भागीदाराने दुसऱ्या भागीदाराची खोटी सही करून तसा ठराव बॅँकेला सादर करीत खाते अधिकारात बदल करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खोट्या स्वाक्षरीसह खाते अधिकार बदलाचा प्रस्ताव सादर करणाऱ्या संशयित संतोष बाभूळकर यांच्यासह बँकेचे शाखा व्यवस्थापक जाँयदीप मैत्रा यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास निवृत्ती कारेकर (रा. नवी मुंबई) यांनी त्यांचे भागीदार व बँक व्यावस्थापक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सुहास कारेकर व संशयित संतोष बाभुळकर यांनी २०१६ मध्ये भागीदारीत टेक्नीपोर्ट सिस्टम नावाची कंपनी सुरू केली होती. कंपनीचे व्यवहार करण्यासाठी पाथर्डी फाटा येथील एका बॅँकेच्या शाखेत दोघांचे संयुक्त खाते उघडले. यावेळी दोघांच्या सहीने किंवा त्यांच्या एकट्याच्या सहीने कंपनीचा पैशांचा व्यवहार होणार असल्याचे ठरले. मात्र, संशयित संतोष बाभुळकर याने फिर्यादी सुहासची खोटी सही करून नोव्हेबर २०१९ मध्ये बनावट ठराव बॅँकेस सादर करीत बॅँक व्यवहाराच्या अधिकारात बदल करून घेतले. त्यामुळे फिर्यादीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
भागीदाराच्या खोट्या स्वाक्षरीने बँक खात्याच्या अधिकारात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:15 AM