- शैलेश कर्पे
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची संचालक मंडळाची चुरशीची निवडणूक झाली. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सहकार विकास पॅनलला ८ जागा मिळाल्या तर विरोधी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या जनसेवा विकास पॅनलला ७ जागा मिळाल्या. अतिशय अटीतटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोकाटे गटाने बहुमत मिळविल्याने सत्ताधारी वाजे गटाला सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
रविवारी सकाळी ८ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सोसायटी गटाच्या ७ जागांसाठी १०० टक्के मतदान झाले होते. दिवसभर मतदान केंद्राबाहेर समर्थक व उमेदवारांनी गर्दी केली होती. अनेकदा उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी मतदान केंद्रावर काही काळ तळ ठोकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सोसायटी व कृषी निगडीत सहकारी संस्थाच्या सर्वच्या सर्व ८ जागांवर कोकाटे यांच्या सहकार विकास पॅननले बाजी मारली. त्यानंतर मात्र उर्वरित सात जागा वाजे यांच्या जनसेवा विकास पॅनलने राखल्या.
सोसायटी गटातून कोकाटे गटाचे नितीन आव्हाड(५७), माधव आव्हाड (५५), रामनाथ कर्पे(५५), माणिक गडाख (५३), संजय गोराणे (५३), भागवत चव्हाणके (५४), युवराज तुपे (५५) विजयी झाले. तर वाजे गटाचे कैलास कातकाडे, (३८), ताराबाई कोकाटे (३८), छबू थोरात (३९), रामदास दळवी (३६), अमित पानसरे (४०), ज्ञानेश्वर बोडके (३९) व सुकदेव वाजे (४२) पराभूत झाले. कृषी निगडीत संस्थेच्या एका जागेसाठी कोकाटे गटाचे अरुण शंकर वाजे यांनी वाजे गटाचे विठ्ठल राजेभोसले (२) यांचा पराभव केला. व्यक्तीगत गटात वाजे गटाचे विशाल आव्हाड (३४१) व पोपट शिरसाट (३४९) यांनी कोकाटे गटाचे कैलास निरगुडे (२९९) व अजय सानप (२७९) यांच्यावर मात करीत विजय मिळविला.
महिला गटातून वाजे गटाच्या सुशीला राजेभोसले (४२१) व नीशा वारुंगसे (४१५) यांनी कोकाटे गटाच्या हिराबाई उगले (३४४) व शांताबाई कहांडळ (३४७) यांच्यावर विजय मिळविला. भटक्या विमुक्त जाती/जमाती गटात वाजे गटाचे लहानू भाबड (४१०) यांनी कोकाटे गटाचे विलास लहाणे (३७७) यांच्यावर मात केली. इतर मागास वर्गाच्या गटात वाजे गटाचे राजेंद्र सहाणे (४२०) यांनी कोकाटे गटाचे रामदास सहाणे (३७०) यांना पराभूत केले. अनुसूचित जाती जमातीच्या गटात वाजे गटाचे रावसाहेब आढाव (४३०) यांनी कोकाटे गटाचे राजेश नवाळे (३५८) यांच्यावर मात केली.