देवळा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणनिहाय आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेक दिग्गजांसह इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी या निवडणुकीसाठी देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यामुळे शहरातील मतदारांना मतदानाचा हक्क राहणार नसल्यामुळे गटांच्या रचनेत फेरबदल झाले आहेत.देवळा तालुक्यात लोहोणेर, उमराणे व पूर्वाश्रमीच्या देवळा गटाऐवजी आता वाखारी या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी लोहोणेर गट सर्वसाधारण महिला राखीव आहे. उमराणे गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. वाखारी गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, देवळा शहरातील सर्व इच्छुकांच्या उमेदवारीची चर्चा याच गटात दिसून येत आहे. जि. प. वाखारी गटात पंचायत समितीचे वाखारी व खर्डा असे गण आहेत. देवळा शहर निवडणुकीपासुन दूर राहणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही ग्रामीण भागाची निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात इच्छुकांनी मतदारांच्या भेटी घेऊन संपर्क साधण्यास सुरु वात केली आहे. देवळा शहरातील देखील अनेक इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत असल्याने वाखारी व लोहोणेर गटात शहरी विरुद्ध ग्रामीण अशा लढती बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेसाठी वाखारी गटातून निवडणूक लढविण्यासाठी देवळा शहरातून सर्वाधिक इच्छुक आपली दावेदारी करत आहेत. पूर्वाश्रमीच्या देवळा गटात वाखारी गटातील गावांचा समावेश होता. यामुळे या गटावर देवळा शहरातील उमेदवारांचे वर्चस्व प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आले आहे. जिल्हा परिषदेत विद्यमान कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर व समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव हे दोन विद्यमान सभापती देवळा येथील असल्यामुळे जि.प.मध्ये देवळ्याचे वर्चस्व ठळकपणे नजरेस दिसून येते. यापूर्वी जि.प. व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली की गटात देवळ्याचा उमेदवार व गणात ग्रामीण भागातील उमेदवार हे समीकरण ठरलेले असे. ग्रामीण भागातील उमेदवार गटात निवडणूक लढविण्यासाठी फारसा उत्साही नसे. जि.प. गट असो अथवा पंचायत समिती गण असो, देवळा शहरातील मोठ्या संख्येने मतदार हा स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देत आल्यामुळे गटात तसेच गणात शहरातील उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असे. (वार्ताहर)
देवळ्याचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यामुळे गटांच्या रचनेत फेरबदल
By admin | Published: October 20, 2016 12:37 AM