- अझहर शेखनाशिक : भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे. त्यानुसार अग्नीवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी, ट्रेड्समन अशा विविध पदांच्या भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी येत्या १५मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कार्यालयाने केले आहे.
अग्नीवीर भरती प्रक्रियेत भारत सरकारकडून बदल करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर येत्या १५मार्च मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी १०वी उत्तीर्ण तर ट्रेडसमन पदासाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी कळविले आहे. यापुर्वी अगोदर शारिरिक चाचणी होऊन लेखी परीक्षा द्यावयाची होती; मात्र आता अगोदर उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे. परिक्षेनंतर उमेदवारांचा मैदानात शारिरिक चाचणीमध्ये कस लागणार आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांना संधीभारतीय भूदलात चांगल्या नोकरी बजावण्याची संधी अग्नीवीर म्हणून जिल्ह्यातील युवकांकडे आहे. आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थीदेखील वरील पदांकरिता भरती केली जात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील युवकांना संधी आहे. कारण महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने उइच्छुकांनी ऑनलाइन अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा आहे भरतीचा टप्पाअग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे कापले यांनी यांनी सांगितले.