लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने नवीन विकास आराखड्यातील अंतिम नकाशे प्रसिद्ध केले असले तरी त्यात सातपूर भागातील पूररेषा हलविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, महापालिकेने चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे नकाशा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा भागश: विकास आराखडा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. ९ जानेवारी २०१७ रोजी घोषित केला होता. भागश: प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम विकास आराखड्यातील विविध ७७ आरक्षणांमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यातील ३१ आरक्षणे वगळण्यात आली होती. प्रामुख्याने, त्यात रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करतानाच बगिचे, प्रदर्शनीय मैदान यांसारख्या सार्वजनिक आरक्षणांना कात्री लावण्यात आली होती. ७९ आरक्षणांबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन नवीन विकास आराखड्याच्या अंतिम नकाशांची प्रतीक्षा लागून होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी विकास आराखड्याचे अंतिम नकाशे दुरुस्तीसह प्रसिद्ध करण्यात आले. या नवीन विकास आराखड्यातील नकाशांमध्ये गोदावरी नदीवरील सातपूर भागातील लाल व निळी पूररेषाच हलविण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा विकास आराखड्याविषयी संशय निर्माण झाला आहे. सदर पूररेषा हलविण्याचा प्रकार कोणाच्या हितासाठी झाला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधी जाहीर केलेल्या धोरणाबद्दलही काही सूचना महापालिकेने पुन्हा एकदा शासनाला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर धोरण जाहीर झाल्यानंतर महापालिकेने त्यात नाशिकच्या संबंधी एफएसआय बदलाबाबतच्या काही सूचना मांडल्या होत्या. परंतु, धोरणात त्याचा समावेश झाला नसल्याने मनपाने पुन्हा एकदा त्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे.
नवीन विकास आराखड्यात पूररेषेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:10 AM