पेठ : नाशिक डिस्ट्रिक्ट प्रायमरी टीचर्स के्रडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्राथमिक शिक्षक संघाच्या परिवर्तन पॅनलने परिवर्तन घडवत आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली, तर शिक्षक समितीसह इतर पाच संघटनांच्या प्रगती पॅनलला विरोधी बाकावर बसवले आहे. पंधरा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची शनिवारी नाशिक येथील समर्थ मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी पी.आर. शिंपी यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. यावेळी सात टेबलवर ४५ मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्वप्रथम जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी इतर मागासवर्ग गटाची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये परिवर्तनचे दीपक सोनवणे यांनी प्रगतीच्या नरेंद्र अहिरे यांच्यावर मात करीत परिवर्तनचा झेंडा लावला, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून चंद्रशेखर ढाबळे यांनी आनंदा कांदळकर यांच्यावर मात करीत ही जागा जिंकली. अनुसूचित जाती जमाती गटातही परिवर्तनचे मोतीराम नाठे यांनी आपला विजय निश्चित केला. निकाल घोषित होताच प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर.के. खैरनार, सरचिटणीस सुभाष आहिरे आदिंच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सोमेश्वर महादेव मंदिरात विजयी सभा घेण्यात आली. यावेळी परिवर्तन विकास पॅनलच्या वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नवनिर्वाचित संचालक बांधील राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत परिवर्तन
By admin | Published: September 26, 2015 9:45 PM