नाशिक- महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वी प्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव्या यासाठी समितीचा आग्रह आहे.
महापालिका शिक्षण समितीची बैठक सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवनात पार पडली. यावेळी नव्या शैक्षणिक सत्राविषयी चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या एकुण १२८ शाळा होत्या. त्यातील अनेक शाळा बंद करून तर काहींची समायोजन करून ९० शाळा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच सोेयीचा विचार करून एकाच सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या संमतीने घेतला. परंतु तो अव्यवहार्य असल्याचे शिक्षकांचे आणि शिक्षण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. एकाचवेळी वर्ग भरत असल्याने अनेक शाळांमध्ये एकाच वेळी शंभर ते दीडशे मुलांना शिकवायला लागते. त्यामुळे मुलांना नीट शिकवले जात नाही अशी तक्रार आहे. त्यामुळे यापूर्वी देखील हा विषय चर्चिला गेला होता.
शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सदरचा निर्णय आयुक्तांचा असल्याचे सांगितल्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.