नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीसाठी शहर व परिसरात जय्यत तयारी झाली आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच प्रमुख रस्ते, चौकांत लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले आहे. यानिमित्तसामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या दिवशी शहरातून निघणारी मिरवणूक लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीवर काही निर्बंध आणले आहेत. शहरातील मिरवणुकीला भद्रकालीतील मोठा राजवाडा येथून सुरुवात होते. वाकडी बारव, कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, मंगेश मिठाई, रविवार कारंजा, रेड क्रॉस, सांगली बँक, नेहरू उद्यान, व्यापारी बँक, शालिमार, देवी मंदिरमार्गे शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप होईल. त्यामुळे मिरवणूककाळात हा संपूर्ण मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या काळात दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, सांगली बँक, सिग्नल मार्गे शालिमार व सीबीएसकडे जाणाºया शहर वाहतुकीच्या बसेस व इतर वाहने ही दिंडोरी नाका येथून पेठ फाटा सिग्नल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौकमार्गे सिडको आणि नाशिकरोडकडे जातील. वाहतुकीचे हे निर्बंध मिरवणुकीतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागू राहणार नसल्याचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी म्हटले आहे.शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तपरिमंडळ-१ मध्ये पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४०० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत़ यामध्ये ९ पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १८२ पोलीस (महिला व पुरुष), १५० होमगाडर््स, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाच्या चार तुकड्या तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तास असणार आहे़४परिमंडळ-२ मध्ये पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३५० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत़ यामध्ये ६ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १५५ पोलीस (महिला व पुरुष) १५० होमगार्ड्स, ६० महिला होमगार्ड्स, दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, तर राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तास असणार आहे़ याखेरीज पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्तही तैनात असणार आहे़
जयंती मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:54 AM