नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी न्या. चपळगावकर यांना सूत्रे प्रदान करीत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.रविवारी सकाळी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत न्या. चपळगावकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये न्या. चपळगावकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष न्या. चपळगावकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाचा वारसा खूप समृद्ध असून, त्या परंपरेत स्थान मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. प्रतिष्ठानची कार्यकक्षा विस्तारित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. अजून कोणत्या प्रकारचे कार्य करता येईल, त्याबाबतदेखील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक विद्वान व्यक्तींचे ज्ञान, त्यांच्याजवळील विपुल भांडार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत कसे पोहोचवता येईल, त्याबाबतदेखील विचार केला जाणार असल्याचे न्या. चपळगावकर यांनी सांगितले.मूल्य जपण्याची ताकदकुसुमाग्रज प्रतिष्ठान हे सत्ताधीश किंवा राजकारण्यांची मदत घेऊनही कधी त्यांच्या कह्णात गेले नाही. ही तारेवरची कसरत येथील पदाधिकाऱ्यांनी जमवून दाखवली आहे. मात्र, सरकारवरच अवलंबून राहिलो तर कार्याचा दर्जा हळूहळू घसरत जातो. तसे होऊ नये, ही दक्षतादेखील घ्यावी लागेल. तसेच कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेली समता, स्वायत्तता आणि बंधुता ही आपली मूल्य जपण्याची ताकद आपल्यात असल्याचेही न्या. चपळगावकर यांनी नमूद केले.चाकोरीबाहेरील कार्यकोणत्याही शासनाला काम करायचे असल्यास चाकोरीतच करावे लागते. त्यापेक्षा काही वेगळे भरीव कार्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा असल्याचे न्या. चपळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वायत्ततेचा लाभ घेत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यभरात कार्य करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. मराठी माध्यमातील आणि मातृभाषेतून बोलणारे अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे मुलांना मराठी माध्यमांसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी शासनाने मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांची निर्मिती करून त्या आदर्श पद्धतीने चालवल्या तर मराठी शाळांकडील कल वाढून मराठीला चालना मिळू शकेल, असे मतदेखील न्या. चपळगावकर यांनी केले. त्याशिवाय शासनाने अन्य भाषांशी आपले आदान-प्रदान चांगले व्हावे, यासाठी अनुवादाचा स्वतंत्र विभाग निर्माण करायला हवा, अशी अपेक्षादेखील न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चपळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 1:13 AM