नाशिक : महापालिकेत पुरेसे मनुष्यबळ असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे एकीकडे करत असले तरी, सद्यस्थितीत अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा भासत आहे. पालिकेत महत्त्वाची खाती ही प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी सुमारे १४ अधिकाºयांची प्रतिनियुक्तीवर मागणी शासनाकडे केली आहे. परंतु, शासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता महापालिकेला अधिकारी मिळणे अवघड मानले जात आहे. महापालिकेत ७०९० पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे १७०० पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाचा डोलारा वाढत असल्याने शासनाकडून नोकरभरतीला मनाई आहे. त्यात दरमहा सेवानिवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या वाढत चालली आहे. सन २०१६ मध्ये महापालिकेतून १११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर सन २०१७ मध्ये ती संख्या १३३ इतकी होती. सन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सन २०१९ मध्ये तर अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिकाºयांसह बव्हंशी कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कुशल व अनुभवी कर्मचाºयांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी १३३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दोन वैद्यकीय अधिकाºयांनी राजीनामे दिले शिवाय, शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार आणि विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला. चार दिवसांपूर्वी शहर अभियंता उत्तम पवार हे निवृत्त झाले. सद्यस्थितीत, महापालिकेत उद्यान अधीक्षक, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपआयुक्त प्रशासन, शहर अभियंता आदी महत्त्वाची पदे प्रभारींच्या हाती आहेत. त्यात, मुख्य लेखापरीक्षकांकडे प्रशासनाचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांची तारांबळ उडताना दिसते, तर आरोग्य व वैद्यकीय या दोन महत्त्वाच्या खात्यांवर प्रभारी नेमणुका आहेत. कर विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांचाही कालावधी संपुष्टात आलेला आहे, तर नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल यांचा कालावधी जूनमध्ये संपुष्टात येईल. महापालिकेत कर्मचारीवर्ग पुरेसा आहे परंतु, अधिकारीवर्गाची वानवा आहे, हे वास्तव आयुक्तांनीही मान्य केले आहे. त्यानुसार, त्यांनी शासनाकडे अधिकाºयांची मागणी केलेली आहे.शहर अभियंताही प्रतिनियुक्तीवर?शहर अभियंता उत्तम पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सदर कार्यभार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्याकडे येणे अपेक्षित होते. परंतु, चव्हाणके यांच्याकडे असलेली महत्त्वाची जबाबदारी लक्षात घेऊन आयुक्तांनी घुगेंची निवड केल्याचे समजते. मात्र, आयुक्तांनी शहर अभियंता पदासाठीही शासनाकडे प्रतिनियुक्तीवर अधिकाºयाची मागणी केली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहर अभियंता या महत्त्वाच्या पदावर बाहेरचा अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत महत्त्वाची खाती प्रभारींच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:31 AM