लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वणी (ता. दिंडोरी) येथील वनविभागाच्या विश्रामगृहाची चावी दिली नाही, याचा राग येऊन वनविभागाच्या चौकीदारास मारहाण करणाऱ्या पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील हवालदारास तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिले आहेत.वणी येथे वनविभागाचे ओझरखेड धरणाला लागूनच निसर्गरम्य विश्रामगृह आहे. या विश्रामगृहावर मागील रविवारी (दि. ११) पिंपळगाव बसवंत येथील हवालदार सुजित धहाजी जाधव मित्रमंडळींसमवेत गेले होते. तेथील चौकीदार यशवंत किसन हारस याने विश्रामगृहाच्या खोलीची चावी देण्यास नकार दिल्यानंतर सुजित जाधव यास तेथून आल्या पावली परतावे लागले होते. याचा राग मनात धरून पोलीस हवालदार सुजित जाधव यांनी सोमवारी (दि.१२) यशवंत हारस यास मारहाण केली होती. त्याबाबत यशवंत हारस यांनी वणी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिल्यानंतर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात स्थानिक पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुजित जाधव यांच्याबाबत अहवाल दिला होता. पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना सुजित जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकीदारास मारहाण करणारा हवालदार निलंबित
By admin | Published: June 18, 2017 12:26 AM