नाशिक : सद्यस्थितीत अनेकजण सीए उत्तीर्ण होऊन नोकरीकडे वळतात. परंतु, नोकरीपेक्षा स्वतंत्र प्रॅक्टिस केल्यास सनदी लेखापाल म्हणून विविध यशाची शिखरे पादाक्रांत करणे शक्य आहे. वेगवेगळ्या उद्योग समूहांसह लघु व मध्यम उद्योगांमध्येही लेखापरीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीए उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र प्रॅक्टिस करून वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सीए इन्स्टिट्यूट्चे राष्ट्रीय अध्यक्ष निहार जांबूसरिया यांनी केले आहे.
दि इन्स्टिट्यूट् ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे आयसीएआय भवन येथे रविवारी (दि. ३०) सीए निहार जांबूसरिया यांनी इन्स्टिट्यूट्चे सभासद व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, पश्चिम विभागाचे अध्यक्ष मनीष गाडिया व सचिव अर्पित काबरा आदी उपस्थित होते.
नाशिकचे सनदी लेखापाल व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत सीए. निहार जांबूसरिया यांच्यासोबत संवाद साधला. संस्थेचे केंद्रीय परिषद सदस्य आणि प्रादेशिक परिषद सदस्यही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, माजी अध्यक्षांसोबत बैठक घेत त्यांनी देशातील अर्थसंकल्पपूर्व व अर्थसंकल्पानंतरच्या अपेक्षित घडामोडींविषयी चर्चा करतानाच देशाची सध्याची अर्थव्यवस्था आणि करप्रणालीविषयी विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवीन चार्टर्ड अकाैंट कायद्याचीही माहिती देखील दिली. तसेच सीए अभ्यासक्रमाचे महत्त्व व काळानुसार होणारे बदल समजावून सांगितले.
यावेळी नाशिक शाखेचे नवनिर्वाचित समिती सदस्य अभिजित मोदी, सोहिल शाह, मनोज तांबे, जितेंद्र फाफट, राकेश परदेशी, विशाल वाणी व संजीवन तांबुळवाडीकर यांच्यासह अध्यक्ष राजेंद्र शेटे, पियुष चांडक, हर्षल सुराणा, रोहन आंधळे आदी उपस्थित होते.