इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या, लुटमारीच्या घटनांनंतर या वर्षातील पहिली सोनसाखळीची घटना बुधवारी (दि.८) भरदुपारी चार्वाक चौक रस्त्यावर घडल्याने संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी सर्वाधिक सोनसाखळ्या चोरीच्या घटनांचा विक्रमदेखील याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावरून नितू जगन शेळके (२५, नागनाथ रो-हाउस, पांडव नगरी) या दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास त्यांच्या स्कुटी दुचाकीने चार्वाक चौकच्या दिशेने येत होत्या. यावेळी महिला बँकेजवळ त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वार चोरट्याने शेळके यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम सोन्याच्या पट्टीचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोनसाखळी असे एकूण ४५ हजार रुपयांचे दागिने हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हेल्मेटधारी चोरटा काळ्या रंगाच्या दुचाकीवर एकटाच होता, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. या भागात सीसीटीव्ही कॅमेरेदेखील कार्यान्वित आहे, तरीही सोनसाखळी चोरी झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आठवडाभरापूर्वीच रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी मिळून एका युवकाला शंभरफुटी रस्त्यावर रिक्षामधून नेत मारहाण करत दम देऊन लुटल्याची घटना घडली होती. तसेच याच आठवड्यात दोन ते तीन घरफोड्याही घडल्याने २०२० या वर्षाची सुरुवातच इंदिरानगर पोलिसांना आव्हान देणारी ठरत आहे.५०० क्यूआर कोड अन् ४० सीसीटीव्हीइंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५०० क्यूआर कोड लावण्यात आले आहे. हे क्यूआर कोड स्कॅनिंग करणे गस्तीवरील बिट मार्शलपासून सर्वांनाच बंधनकारक आहे, मात्र कोड स्कॅनिंगची वेळ चोरट्यांनी माहिती करून घेतली असून जेव्हा पोलीस क्यूआर कोड स्कॅन करून पुढे रवाना होतात त्यानंतर चोरटे त्या भागात लक्ष ठेवून सोनसाखळी हिसकावतात, असे या भागातील नागरिकांनी सांगितले. प्रभाग ३०मधील इंदिरानगर परिसरातील सर्व मुख्य रस्ते व चौक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आहे. जवळपास ४०पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात यापूर्वीच लावण्यात आले आहेत, तरीही गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत पोबारा करतात हे विशेष!
चार्वाक चौक रस्त्यावर भरदुपारी महिलेची सोनसाखळी खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:09 AM
इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या, लुटमारीच्या घटनांनंतर या वर्षातील पहिली सोनसाखळीची घटना बुधवारी (दि.८) भरदुपारी चार्वाक चौक रस्त्यावर ...
ठळक मुद्देपोलिसांना खुले आव्हान : लुटीची आठवड्यात दुसरी घटना