सिडको : श्रीरामपूर येथून पल्सर दुचाकीद्वारे सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये येऊन मॉर्निंगवॉक करणाऱ्या, तसेच कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून लगेचच कपडे बदलून पलायन करणाऱ्या इराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोघा अट्टल सोनसाखळी चोरट्यांना अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांनी पाठलाग करून पकडले. या दोघांनी सकाळच्या सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेल्या सोनसाखळ्या हस्तगत केल्या आहेत.शनिवारी सकाळच्या सुमारास श्रीरामपूर येथून नाशिक शहरात पल्सर दुचाकीवर इराणी म्हणून ओळखले जाणारे काही चोरटे दाखल झाल्याचे कळताच पोलिसांनी लगेचच सरकारवाडा, पंचवटी, उपनगर भागातील पोलीस स्टेशनला वायरलेसद्वारे याबाबतची माहिती कळवली. हे चोरटे अंबड परिसरात चोरी करण्याच्या तयारीत असतानाच अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले हे गस्त घालत असताना त्यांना पल्सरवरुन दोघे संशयितरीत्या जात असताना हटकले असता त्यांनी पल्सरचा वेग वाढविला. बर्डेकर व इंगोले यांनी पाठलाग करून दोघांना पकडले. यामुळे अंबड हद्दीत होणारी सोनसाखळी चोरीची घटना टळली. या दोघांना अटक करून त्यांची चौकशी केली असता ते श्रीरामपूर येथील अट्टल सोनसाखली चोर असल्याचे सिद्ध झाले. (वार्ताहर)चोरीचा माल केला हस्तगतश्रीरामपूर येथून आलेल्या या चोरट्यांकडून दोन सोनसाखळ्या, अंगठी व पल्सर दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यांनी सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या हद्दीत चोरी केलेल्या दोन सोनसाखळ्या, एक अंगठी व पल्सर दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
पाठलाग करून सोनसाखळी चोरांना केले जेरबंद
By admin | Published: November 28, 2015 10:58 PM