दिंडोरी : आॅनलाइन व संगणक प्रणाली वापरण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे) यंत्रणेलाही बोटांच्या ठशाचा रबरी स्टॅम्प बनवत आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील दिंडोरीत उघडकीस आला आहे. सदर प्रकार सुरू असलेल्या आधार केंद्राच्या आॅपरेटरविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत सदर केंद्रातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तहसील कार्यालय आवारात जुन्या सेतू केंद्रात आधार केंद्र सुरू होते. सदर केंद्रात सुपरवायझर,आॅपरेटर यांना सदर प्रणालीला अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य असून सदर व्यक्तीला ते काम करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे प्रत्येकवेळी थोडे फार वेगळे येणे अपेक्षित असताना येथील केंद्रातून अपलोड होणारे बोटांचे ठसे हे एकसारखे येत असल्याचे मुंबई येथील आधारच्या मुख्य कार्यालयाचे निदर्शनास आले. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास हा प्रकार कळविण्यात आला. या कार्यालयाची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर प्रकार गंभीर असल्याने दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात केंद्रातील आॅपरेटर कैलास गायकवाड (रा.मडकीजांब) यांच्याविरु द्ध फसवणुकीची तक्र ार दिली असून दिंडोरी पोलिसांनी सदर आधार केंद्रातील साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे अधिक तपास करीत आहेत.