नाशिक : तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतलेल्या परीसस्पर्श अॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मुदत पूर्ण होऊनही परतावा न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी कंपनीचे दोन चेअरमन व संचालकाविरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्यात कल्पना सुनील तायडे (रा. ए-१, गगनदीप सोसायटी, बेला डिसुझा रोड, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित श्याम निवृत्ती चव्हाण (रा. हरेकृष्ण अपार्टमेंट, सम्राट स्वीट्सच्या मागे, गुरुगोविंदसिंग कॉलेजमागे, इंदिरानगर), ज्योती संजय जुन्नरे (रा. त्रिमूर्ती निवास, आशर इस्टेट, उपनगर, नाशिक) व वाल्मीक कचरू भालेराव (रा. फ्लॅट नंबर १४, कृष्ण रेसिडेन्सी, सर्व्हे नंबर ३१३/१, पाथर्डी, नाशिक) यांनी १ जानेवारी २०१४ ते दि. २७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोरील प्रसन्न आर्केडमध्ये परीसस्पर्श लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी संस्थेचे कार्यालय सुरू केले.
परीसस्पर्श कंपनीचे संचालक असलेल्या या तिघां संशयितांनी विविध योजनांद्वारे तायडे यांच्यासह शेकडो नागरिकांना दामदुप्पट तसेच प्लॉट व फ्लॅटचे अमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ त्यामध्ये तायडे यांनी २ लाख २५ हजार ६४० रुपयांची गुंतवणूक केली होती़ मात्र योजनेप्रमाणे ठेवीची मुदत पूर्ण होऊनही या तिघा संशयितांनी गुंतवणुकीची रक्कम व त्यावरील व्याज परत न करता फसवणूक केली़ या संचालकांनी गुंतवणूकीची रक्कम कंपनीच्या व्यवसायासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून तिचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
दरम्यान, या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केल्याचे वृत्त आहे़