नाशिक : ओझर विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सिडकोतील तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिडकोतील विजयनगरमध्ये सागर गोपाळ महाजन (२३, रा़ माताजी चौक) हा तरुण राहतो़ ५ ते ९ जुलै या कालावधीत संशयित राजेशकुमार याने ९८७३६६३४४३ व ८८६०६७९८५० या मोबाइल क्रमांकावरून सागरच्या मोबाइलवर फोन करून इंडिगो एअरलाईन्स मुंबईहून बोलत असल्याचे सांगितले़ यानंतर नाशिकच्या ओझर विमानतळावर ग्राउंड स्टाफमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सागरचा विश्वास संपादन केला़ यानंतर नोकरीसाठी आॅनलाइन बँकिंगच्या माध्यमातून सागरकडून १ लाख ५१ हजार ८११ रुपये घेतले़ विमानतळावरील नोकरीसाठी पैसे भरूनही कॉल न आल्याने वा विचारणा न झाल्याने त्याने राजेशकुमार याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयन केला़ मात्र, संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सागरच्या लक्षात आले़ त्याने तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून संशयित राजेशकुमार याच्या विरोधात फिर्याद दिली़
विमानतळावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:01 AM