सिन्नर : ‘ओएलएक्स’ वर कार पाहून विक्रेत्याकडून हप्त्याने खरेदी करुन तीचे बनावट कागदपत्रे बनवून सदर कार सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील एकाला विकणाऱ्या ठकबाजाविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसई, पालघर येथील अजयसिंह ऊर्फ पवन राजेश सिन्हा ऊर्फ रोहीत राजेंद्रकुमार धवन याने ओएलएक्स व मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम. एच. ४६ बी. बी. ६१३६) पाहून नवी मुंबई येथील विक्रेत्यांला रोख ५० हजार रुपये देऊन उर्वरित हप्ते फेडण्याचे सांगून कार खरेदी केली होती. त्यानंतर या ठकबाजाने सदर कारचे आर. सी. बुक, इन्शरन्स कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, एमयुएम करार असे बनावट कागदपत्रे यवतमाळ येथील पुष्पाबाई माधव गुल्हाणे यांच्या नावाने बनवून घेतले. सदर कारची नंबरप्लेट एम. एच. २९ बी. सी. ०४५८ अशी बनवून त्या नावाने आर. सी. बुक बनवून घेतले. सदर कार सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील राजेंद्र शंकर पगार यांना ४ लाख १ हजार रुपयांना विकली.ओएलएक्स च्या माध्यमातून कार विकणाऱ्या विक्रेत्याचे हप्ते न भरले गेल्याने त्याने नवी मुंबई पोलिसांत तक्रार केल्यानंतर वसई, पालघर येथील अजयसिंह ऊर्फ पवन राजेश सिन्हा ऊर्फ रोहीत राजेंद्रकुमार धवन या संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर पांगरी येथील राजेंद्र पगार यांना कार विकल्याचे उघड झाले. त्यानंतर पगार यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार वावी पोलिसात दिली. संशयित अजयसिंह ऊर्फ पवन राजेश सिन्हा ऊर्फ रोहीत राजेंद्रकुमार धवन याच्याविरोधात वावी पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचे बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 5:36 PM