नाशिक : कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप देण्यासाठी व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची अनामत रक्कम घेतल्यानंतर पाच संशयितांनी संबंधित व्यावसायिकाचे शेअर्स स्वत:च्या नावावर करून दोन कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी जामनेर येथील संशयित मुकेश किशोर बोहरा, स्वप्नील विनोद बाफना, विनोद उत्तमचंद बाफना व सुभाषचंद बोहरा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सौभाग्यनगरमधील अरिहंत अपार्टमेंटमध्ये सुशील कपूरचंद पगारिया (५६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ६ जुलै २००९ ते १० जानेवारी २०११ या कालावधीत जळगाव येथील फनटीन न्यूट्रीशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संशयित मुकेश बोहरा, स्वप्नील बाफणा, विनोद बाफणा, सुभाषचंद्र बोहरा यांनी डिस्ट्रीब्युटरशिप देतो, असे सांगितले़ यानंतर कंपनीचा राजीनामा देऊन संचालक असल्याचे भासवून पगारिया यांच्यासोबत करारनामा केला़ पगारिया यांनी फनटीन न्यूट्रीशन्स कंपनीच्या डिस्पॅच पॉइंटसाठी महाराष्ट्राच्या डिस्ट्रिब्युटरशिपसाठी या चौघा संशयितांना अनामत रक्कम दिली होती; मात्र त्यांनी पगारिया यांची परवानगी न घेता कंपनीचे शेअर्स परस्पर स्वत:च्या नावावर करून घेत त्यांच्याकडील दोन कोटी दोन लाख ३७ हजार ७४० रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.
कंपनी डिस्ट्रीब्युटर्सशिपच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:17 AM