नाशिक : घर गहाण आहे, बहिणीचे लग्न करावयाचे असे कारण देऊन भावनिक करून नकली हार सोन्याचा असल्याचे भासवून एका इसमाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला आहे़ याप्रकरणी नागपूरमधील पुरुषासह एका महिलेविरोधात फसवुणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ देवळाली कॅम्पमधील मीलन लाइन सातबट्टा येथे संतोषकुमार त्रिवेणीसिंग यादव राहतात़ दि. १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत देवळातील रेणुकादेवी मंदिर परिसरात संशयित विजय दशरथ चौधरी व एक अनोळखी महिला (दोघेही रा़ नागपूर) त्यांना भेटली़ या दोघांनी घर गहाण असल्याचे तसेच बहिणीचे लग्न करावयाचे असल्याची करुण कहानी सांगून यादव यांना भावनिक केले़ यानंतर पैशांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून जवळील ७९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नकली हार देऊन तो खरा असल्याचे भासवून यादव यांच्याकडून चार लाख रुपये घेतले़ दरम्यान, या सोन्याच्या हाराबाबत चौकशी केल्यानंतर तो नकली असल्याचे समोर आले़ यानंतर यादव यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित चौधरी व अनोळखी महिलेविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़
सोन्याचा हार असल्याचे भासवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:55 AM