पंचवटी : शासकीय नोकरी लावून देतो असे सांगून जवळपास ५० बेरोजगारांना ५१ लाख रुपयांना गंडा घालून फरार झालेल्या संशयित आरोपी संतोष चंद्रभान मुळे (५५) याला सोमवारी (दि.२५) पंचवटी पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. मुळे याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
२००८ मध्ये पंचवटीतील क्रांतीनगर येथे राहणाऱ्या मुळे याने अनेक बेरोजगार युवकांना माझी अनेक शासकीय कार्यालयात ओळख असल्याचे भासवून तुम्हाला शासकीय नोकरी लावून देतो असे सांगून जवळपास ५१ लाख रुपयांना गंडा घातला होता. फसवणूक झाल्यानंतर मुळे याच्यावर २००८ मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर मुळे फरार झाला होता. पोलिसांनी अनेकदा त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळताच तो पसार व्हायचा.
बेरोजगार युवकांना शासकीय नोकरी लावून देतो प्रकरणातील संशयित मुळे हा नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. घिसाडी यांच्या सह पोलीस पथकाने किनवट गाठून मुळे याला बेड्या ठोकल्या आहेत. मुळे हा गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवित असल्याचे समजते. मुळे याने फसवणूक केलेल्यात पोलीस कर्मचारी व इतर शासकीय नोकरदार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. सोमवारी मुळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.