नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून आपल्या बाजूने मतदान करून घेण्याच्या राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मनसुबे ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या पर जिल्हा, राज्यांच्या सीमांवर चेकनाके उभारले असून, विशेष करून दमण, दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर तस्करीच्या माध्यमातून येणाऱ्या अवैध मद्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्यात आल्याची माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांवर प्रभाव टाकू इच्छिणा-या प्रत्येक अनुचित घटनांंवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, जिल्हाधिका-यांनीही त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध मद्य रोखण्याबाबत सूचित केले आहे. त्याचा विचार करता राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन भरारी पथके व दोन विशेष भरारी पथके असे पाच पथके जिल्ह्यात गठीत केले असून, चार चेकनाके नव्याने उभे करण्यात आले आहे. विशेष करून पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमार्गे दमण, दीव, दादरा नगर हवेली येथून विदेशी मद्याची तस्करी केली जाते. या संदर्भात वारंवार कारवाईदेखील करण्यात आली आहे. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर या तस्करीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने बोरगाव, आंबोली या चेकनाक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या शिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक निरीक्षक व सहायक निरीक्षकाची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या अधिकाºयांमार्फत मतदारसंघात अवैध मद्यविक्रीवर केली जाणारी कारवाईबाबतची दैनंदिन माहिती सादर करतील शिवाय आयोगाच्या सूचनेवरून कार्यरत असतील. याशिवाय रात्रीच्या वेळी जिल्ह्यात गस्त घालण्यात येणार असून, संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे राजपूत यांनी सांगितले.जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाºयांची यादी तयार करण्यात आली असून, ज्यांच्यावर यापूर्वी वारंवार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्यावर कलम ९३ अन्वये प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. अशा १४९ दारू विक्रेत्यांना मज्जाव करण्याबाबत प्रांत अधिकाºयांकडे प्रस्ताव दाखल आहेत.