नाशिक : वनपटट्यांसाठी दाखल करण्यात आलेले दावे लवकर निकाली काढण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या हेतूने जूने दस्तऐवज तपासून यातून मार्ग काढण्यासाठी नियोजनात्मक कार्यक्रम आखण्याच्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वन समिती स्तरावर निकषांची पूर्तता करून जलदगतीने निपटरा करावा, असेदेखील त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी घेतला. या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार, माणिकराव कोकोटे, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, अकोलेचे आमदार किरण लहामटे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आदिवासी विभाग हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, अपर आयुक्त आदिवासी विभाग गिरीष सरोदे, मुख्य वनसंरक्षक नितीन बुधगे, उपवन संरक्षक तुषार चव्हाण, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, राजूरचे प्रकल्प अधिकारी राजूर संतोष ठुबे, कळवण प्रकल्प अधिकारी विकास मीना उपस्थित होते.
यावेळी झिरवाळ म्हणाले की, वनपट्टेधारकांच्या दावे पूर्तता करण्यासाठी तालुका स्तरावरील समितीकडून दावे पूर्ततेस आवश्यक असलेले तीन पुरावे दावेदारांना उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. वन अधिकारी यांनी सदर प्रकरणांतील जुने दस्तऐवज तपासून आवश्यक पुरावे उपलब्ध करून प्रकरणांचा जलद गतीने निपटरा होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही झिरवाळ यांनी दिल्या आहेत. दरम्यान,
अनुसूचित जमातीच्या बांधवांपर्यंत खावटी योजनेचा लाभ पोहोचणे आवश्यक आहे. याबाबत सर्वेक्षण करताना लाभार्थ्यांकडे आधार कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रे नसतील, तर प्रकल्प अधिकारी स्तरावर शिबिराचे आयोजन करून त्यांची पूर्तता करून घेण्याचे त्यांनी सांगितले.