नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याअंतर्गत महापालिकेमार्फत सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यात येणार असून, त्यासाठी स्थानिक संस्थेऐवजी बाहेरील तटस्थ यंत्रणेचा शोध सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, कोणत्याही कामाची बिले सर्व तांत्रिक तपासणीनंतरच अदा केली जातील, असेही गेडाम यांनी स्पष्ट केले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिकेमार्फत तपोवनातील साधुग्रामसह रिंगरोडची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. महापालिकेला त्यासाठी आतापर्यंत शासनाकडून सुमारे ३०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, तर सुमारे २२५ कोटी रुपये मनपाने खर्च केले आहेत. मंगळवारी माध्यमांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात साधुग्राममधील सुविधांसह रिंगरोडच्या गुणवत्तेबाबत अनेक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले, शहरात ठिकठिकाणी सिंहस्थाची कामे सुरू आहेत. प्रशासनप्रमुख म्हणून मला एकट्याला सर्व कामांवर देखरेख ठेवणे शक्य नाही. परंतु सिंहस्थ कामांमध्ये काही चुकीच्या पद्धतीने काम होत असल्यास आणि ते निदर्शनास आणून दिल्यास त्याबाबत तत्काळ पाहणी करून निर्णय घेतला जाईल. साधुग्राममध्ये उभारण्यात येणाऱ्या शौचालय आणि स्नानगृहासाठी होत असलेल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या पत्र्यांच्या वापराबाबत जर संबंधित ठेकेदाराकडून निविदेनुसार काम होत नसेल, तर त्याचीही पडताळणी केली जाईल. सर्व तांत्रिक बाबी तपासून पाहूनच अंतिम बिले अदा करण्यात येईल. सिंहस्थ कामांची तटस्थ यंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी स्थानिक संस्थेऐवजी बाहेरील संस्थेची मदत घेतली जाईल. अशा तटस्थ यंत्रणेचा शोध सुरू आहे. पुण्यातील एका संस्थेशी चर्चाही झाली आहे. परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कामांच्या गुणवत्ता नियंत्रण तपासणीसाठी ०.५ टक्के निधी असतो. सदर निधी सिंहस्थ कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी वापरता येईल काय, याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, असेही आयुक्त डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सिंहस्थ कामांची गुणवत्ता तपासणार
By admin | Published: February 19, 2015 12:25 AM