कोमेजलेला दैनंदिन भाजीपाला एका विशिष्ट रसायनात बुडवून तो बाजारात विक्री करत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यापारीवर्ग सर्वसामान्यांची फसवणूक करत असून भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावा, असे चित्र त्या व्हिडीओतून वायरल केले जात आहे. यामागची सत्यता पडताळण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली असून त्यात त्यांना यशही मिळाले आहे. एका मार्केटिंग कंपनीचा हा व्हिडीओ असून त्या कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी आपल्या प्रॉडक्टचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. यात वापरण्यात आलेले द्रावण हे शेतातील उभ्या पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे डिस्ट्रिब्यूटर राजेंद्र बागुल व सचिन भारती यांनी सांगितले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वत्र व्हायरल झालेला हा व्हिडीओ नाशिकचा नसून चांदवडचा आहे. चांदवडमधील एका शेतकऱ्याच्या बांधावर हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे. या व्हिडीओमागील सत्यता समोर आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश परळीकर, अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर, आर. डी. सूर्यवंशी, अविनाश दाभाडे, संदीप देवरे, प्रमोद पाटील आदींनी प्रयत्न केले आहे.
चौकट===
चुकीच्या व्हायरलमुळे एखाद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्हायरल करण्यापूर्वी त्यामागची सत्यता पडताळून पाहणे अपेक्षित आहे.
- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन.
230721\524523nsk_26_23072021_13.jpg
फोटो :- अन्न व औषध प्रशासन विभागात सेव्ह ईको ऑर्गानिकचे डिस्ट्रीब्यूटर राजेंद्र बागुल व सचिन भारती यांचा जबाब नोंदवताना अन्न सुरक्षा अधिकारी.