सातपूर : बनावट नोटा छपाई प्रकरणातील प्रमुख संशयित छबू नागरे याची निमाच्या विशेष आमंत्रित सदस्य पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. निमाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर कार्यकारिणीवर छबू नागरे याला विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. बनावट नोटा छपाई प्रकरणातील प्रमुख संशयित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे निमाला धक्का बसला होता. उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निमा या औद्योगिक संघटनेवर नागरे यास विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले होते. नागरे याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर निमाचे नाव जोडले जात होते. याची गंभीर दखल घेत आज निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यकारिणी समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत छबू नागरे याची निमाच्या कार्यकारिणीवरील विशेष निमंत्रित सदस्य पदावरील नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस सरचिटणीस उदय खरोटे, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर आदिंसह पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. नाशिकमध्ये काही उद्योजकांच्या संघटनांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरतात, अशावेळी निवडणुका बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेकदा राजकीय व्यक्तींची मदत घेऊन त्यांच्या दबावतंत्राचा वापर केला जात असतो.निमाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी समितीने छबू नागरे याची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली होती. याच कार्यकारिणी समितीने त्याची नियुक्ती रद्द केली आहे. - उदय खरोटे, सरचिटणीस, निमा
छबू नागरे याची अखेर निमातून गच्छंती
By admin | Published: December 30, 2016 12:11 AM