संजय पाठक, नाशिक: सध्या लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी सुरू असलेली रस्सीखेच अत्यंत शिगेला पोहोचली आहे. त्यातच नाशिकच्या जागेसाठी असलेले दावेदार राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे या दोघांमध्ये अत्यंत चुरस मानली जाते मात्र आज सकाळी श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी दोघे समोर आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांना वाकून नमस्कार केला आणि भुजबळ यांनीही त्यांना आशीर्वाद दिला.
आज दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी हा प्रकार घडला. नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव श्री काळाराम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी राम भक्तांबरोबर सर्व राजकीय नेते, लोकप्रतिनिधी देखील येत असतात. आज दुपारी राम जन्मोत्सवाच्या दरम्यान छगन भुजबळ यांचे तेथे आगमन झाले आणि समोरूनच शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे देखील आले. त्यानंतर गोडसे यांनी त्यांना नमस्कार केला. या संदर्भात छगन भुजबळ यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता आपले त्यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. ते समोरून आल्यानंतर त्यांनी नमस्कार केल्यावर आपणही त्यांना आशीर्वाद दिला असे मिश्किल पणे सांगितले.
दरम्यान, नाशिकच्या जागेवरील उमेदवारी संदर्भात केव्हा निर्णय होणार या प्रश्नावर विचारल्यावर भुजबळ यांनी मी वरिष्ठांना काय करायचे ते करा मात्र 20 मे म्हणजे मतदानाच्या आत उमेदवार घोषित करा म्हणजे झालं असे सांगितल्याचे असे सांगितले.