धनंजय रिसोडकर/ नाशिक :नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असली तरी त्याबाबतची घोषणा झालेली नाही. तरीदेखील भुजबळ हे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत थेट चंद्रपुरात पोहोचले. तेथील काँग्रेसच्या उमेदवाराविरूद्ध तोफ डागतानाच जातीसाठी नव्हे विकासासाठी मत द्या, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ओबीसी मेळाव्यांमधून आरक्षणाला पहिला विरोध भुजबळ यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून भुजबळ यांना उमेदवारीचे ‘रिटर्न गिफ्ट’ मिळणार ? की त्यांच्यासाठी काही अन्य पर्याय ठरलाय ? अशीच चर्चा आता सुरु झाली आहे.
महायुतीची उमेदवारी अपेक्षित असूनही भुजबळ यांनी उमेदवारीची प्रतीक्षा थांबवत थेट प्रचाराच्या मैदानात उडी घेतली. मात्र, तो प्रचारदेखील स्वत:साठी किंवा स्वपक्षीय उमेदवारासाठी नसून भाजपाचे विदर्भाचे दुसरे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार यांच्यासाठी होता. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, चंद्रपुरात प्रचाराला येऊ नका, असे निरोप मला आले, तरीदेखील मी आल्याचेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात पुन्हा आणायचे आहे. त्यासाठी कुठल्याही जातीचा विचार न करता विकासाला बघून मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे मुनगंटीवारांच्या प्रचारातील भुजबळ यांचा सहभाग आणि नमोचा गजर पाहता भुजबळ यांना उमेदवारीचे ‘रिटर्न गिफ्ट’ किती दिवसात मिळणार ? मराठा आरक्षण आंदोलन काळात ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची मोट बांधली. मोठ्या सभा घेतल्या, महायुतीला समर्थनाची भूमिका घेतली, याकडे त्यांचे समर्थक लक्ष वेधत आहेत.