नाशिक- नाशिक लोकसभेत विजयी होणारा खासदार एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा रिपिट होत नाही म्हणजे सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकत नाही, ही संकल्पना मोडीत काढून सलग दोन वेळा निवडून येण्याचा विक्रम खासदार हेमंत गोडसे यांनी केला. या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ या दोघांना पराभूत केले. मात्र आता दोघे सत्तारूढ पक्षांमध्ये असले तरी मराठा आरक्षणावरून गोडसे आणि भुजबळ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. काल सायंकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांच्यावर कठोर टीका केली आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवताना राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा पराभव केला होता त्यानंतर त्यांनी समीर भुजबळ यांचा दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्यामुळे नाशिकचा खासदार पुन्हा निवडून येत नाही ही नाशिककरांचा समज त्यांनी खोटा ठरवला. दरम्यान, या दोन्ही निवडणुकीमध्ये भुजबळ आणि गोडसे एकमेकांच्या समोर आल्यानंतर पण मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते.
राज्यात सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट आणि हेमंत गोडसे यांचा समावेश असलेला शिंदे गट सत्तेवर आहे मात्र मराठा आरक्षणावरून गोडसे यांनी टीकास्त्र सोडले आहे जालना येथील सभेमध्ये ओबीसी आरक्षणाचे समर्थन करताना भुजबळ यांनी चुकीचे आकडेवारी दाखवली तसेच मराठा समाजाला आव्हान दिले म्हणून गोडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांचे दावे खोडून काढताना जातिवादाचाही गंभीर आरोप केला आहे संविधानिक पदावर असताना विधान करू नये असेही त्यांनी सांगितले अर्थात असे करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली होती काय यावर त्यांनी नकार दिला. आपण केवळ नागरिक म्हणून या विषयावर भाष्य करत आहोत असे सांगितले.