फेसबुक लाईव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी विरोधी नेत्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील गृहमंत्री राहिलो आहे. यात गृहमंत्री काय करू शकतात? गँगवार, आतंकवाद, गुंडगिरी याबाबत गृहमंत्री काम करू शकतात. प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाहीत, असं छगन भुजबळ यांनी सांगितले.
सदर घटनेने मला देखील खूप वाईट वाटलं. विनोद घोसाळकर अनेक वर्ष त्यांनी माझ्यासोबत काम केले होते. त्यांचा मुलगा देखील खूप स्मार्ट आणि चांगला शिक्षित होता. बंदूकच्या परवानाबाबत नियम कठोर केले पाहिजे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून बंदूक काढून घेतली पाहिजे. दंगल, गँगवार, गुंडगिरी अशा प्रकरणात पोलीस काम करत आहेत, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
दोन जणांना घेतलं ताब्यात-
आज सकाळी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शींनं काय सांगितलं?
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी तिथे नेमकं काय झालं? तो थरारक अनुभव सांगितला. 'एका मराठी वृत्तवाहिनी'शी बोलताना लालचंद पाल म्हणाले की, काल सकाळी अकरा वाजता अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला की, संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे. पण साडी वाटण्याआधी, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेले. मी त्यांच्यासोबत होतो. मॉरिसच्या कार्यालयात दोघंही बोलत होते.
मी खूप वेळ झाल्यामुळे दरवाजा उघडूनमध्ये गेलो, तेव्हा दोघं मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्ह करत होते. मी गेल्यावर थोड्यावेळाने आम्ही येतो, असं बोलून मॉरिसने मला बाहेर काढलं, असं लालचंद पाल यांनी सांगितले. त्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी आत धावलो, तर अभिषेक हे खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेक यांच्यावर गोळीबार करत होता, असं लालचंद पाल यांनी म्हणाले. मॉरिस आणि अभिषेकमध्ये आधीच वाद झाला होता, तो संपवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेक यांचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवल्याची माहिती समोर आली आहे.