नाशिक : राष्टवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सद्दी संपली आहे. ते येवला आणि नांदगावमध्ये जागा वाचवू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून, त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. २४) मुंबईत मातोश्री येथे जाऊन थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या असल्या तरी त्याबाबत स्पष्ट निर्णय न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: भुजबळ यांना पक्षात घेतल्यास राज्यात त्यांचा फायदा होऊ शकत नाही काय या त्यांच्या प्रतिप्रश्नामुळे संबंधित संभ्रमात पडले असल्याचे वृत्त आहे.विधानसभा निवडणुकीमुळे पक्षांतरे सुरू असून, त्यातच छगन भुजबळ हे स्वगृही परतणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेतील एक गटाने भुजबळ यांच्या स्वगृही परतण्यास विरोध सुरू केला आहे. शुक्रवारी (दि. २३) शहरात भुजबळ यांच्या विरोधात फलक लागले होते आणि त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते. छगन भुजबळ यांना प्रवेश दिल्याने पक्षाला फायदा होणार नाही, असे सांगताना समजा भुजबळ यांना प्रवेश दिलाच तर त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देऊ नये, अशाही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
छगन भुजबळ यांच्या प्रवेशाच्या विरोधात ‘मातोश्री’वर गा-हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 1:06 AM