नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्टवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर सेना-भुजबळ यांच्यात निर्माण झालेले विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. मध्यंतरी भुजबळ कुटुंबीयांनी मातोश्रीवर हजेरी लावत हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, शिवसेनेत भुजबळांविषयीचा राग मात्र कायम आहे. परंतु, सेनेतून दुरावलेल्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नेहमीच भावनेचा ओलावा कायम राहिला आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राष्टवादी कॉँग्रेसने नाशिक शहरात या चित्रपटाचा विशेष शो आघाडीतील नेते-कार्यकर्त्यांसह निमंत्रितांसाठी येत्या रविवारी (दि.१०) बिग बझार येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात आयोजित केला असून या खेळाला छगन भुजबळांचीही उपस्थिती लाभणार आहे.महाराष्ट्राच्या जडणघडणीत विशेष योगदान देणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे या चित्रपटाचे खेळ सर्वत्र होत आहेत. त्यासाठी शिवसेनेकडूनही ठिकठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जात आहे. सेनेच्या लोकप्रतिनिधींकडून या चित्रपटाच्या शोचे आयोजन केले जात असतानाच राष्टवादी कॉँग्रेसनेही ‘ठाकरे’ चित्रपटाचा विशेष शो येत्या रविवारी (दि.१०) आयोजित करुन बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती भुजबळांमध्ये असलेला श्रद्धाभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या खेळाला स्वत: छगन भुजबळ यांची उपस्थिती लाभणार आहे. या शोसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच काही मान्यवरांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली आहे.
छगन भुजबळ बघणार ‘ठाकरे’ चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 18:17 IST
राष्टवादीकडून रविवारी विशेष शो
छगन भुजबळ बघणार ‘ठाकरे’ चित्रपट
ठळक मुद्देया शोसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच काही मान्यवरांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली आहे