मनमाड : राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या खुल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयभावानी व छत्रे विद्यालयाच्या खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह सलग पाचव्या वर्षी महिलांचे सांघिक विजेतेपद पटकावले आहे.अमरावती येथे झालेल्या ७२ व्या पुरुष ३५ व्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी यश संपादन केले. येथील करुणा गाढे हिने ७६ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलून सुवर्णपदक, खुशाली गांगुर्डे हिने ४९ किलो वजनी गटात १२९ किलो वजन उचलून रौप्यपदक, ४५ किलो वजनी गटात दिया व्यवहारे हिने १०७ किलो वजन उचलून रौप्यपदक, अमृता भाऊसाहेब शिंदे व पूजा मनसुब कुणगर यांनी ४९ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. मुलांमध्ये रमेश सुभाष कोटकर याने कांस्यपदक प्राप्त केले. अनामिका मच्छिंद्र शिंदे, वैष्णवी वाल्मीक इप्पर, पंकज रविकांत त्रिवेदी, सुनील भाऊसाहेब कांगणे यांनी उत्तम कामगिरी बजावली. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, एनआयएस प्रशिक्षक तृप्ती पाराशर, जय भवानी व्यायामशाळेचे जयराम सानप यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:56 PM