लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : नाशिक महानगरपालिकेने मुकणे धरणातून थेट पाइपलाइनने पाणी उचलण्यासाठी विल्होळी जकात नाका येथे उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे भारतीय जनता पक्षाकडून घाटत असताना व शिवेसेनेने या केंद्राला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह धरलेला असताना गौळाणे, विल्होळी, पिंपळद, राजूर बहुला, आंबे बहुला, सारूळ, जातेगाव व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी मात्र या केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन तसा फलक फडकविला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने थेट मुकणे धरणातून पाणी उचलण्याची योजना पूर्णत्वास नेली असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष पाणी उचलले जाईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी विल्होळी जकात नाका येथे जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या केंद्राला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दिला आहे, तर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्यामुळे प्रशासन पेचात सापडलेले असतानाच दोन दिवसांपूर्वी पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी एकत्र येत थेट जलकुंभावर चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणाबाजी करून ‘छत्रपती शिवाजी महाराज जलशुद्धीकरण केंद्र’ नावाचा फलक झळकवला. आता थेट छत्रपतींच्या नावाचा फलक याठिकाणी लावण्यात आल्यामुळे सत्ताधारी भाजपासह शिवसेनेचीही गोची झाली आहे. यावेळी अर्जुन चुंबळे, दादा मेढे, श्याम मते, शिवम देशमुख, काशीनाथ डांगे, दीपक भावनाथ, योगेश चुंबळे आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.